
रोज आपल्याला कोणी ना कोणी – राजकारणी मंडळी, अनोळखी लोक, मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय देखील – ‘उल्लू’ बनवत असतात, जाणून बुजून किंवा अजाणतेपणी. त्याचा त्रास करून घ्यायचा, का त्यावर हसत मार्ग काढायचा, हे आपलं आपण ठरवायचं. आयुष्य आपल्याला कधी गुगली टाकतं, तर कधी बाउन्सर. त्यामुळे विकेट पेक्षा डोकं वाचवण्याची चिंता जास्त. मग आपण सिक्सर मारणार तरी कधी आणि किती? पण म्हणून काय मैदान सोडून निघून जायचं? नाही! वरच्या अम्पायरचा हुकुम येईपर्यंत लढत राहायचं, हसत रहायचं! विनोदाला कारुण्याची झालर असावी असे विचारवंत म्हणतात. इथे जगण्याच्या धडपडीत आयुष्यच इतकं कारुण्यमय झालं आहे कि कधीकधीच त्यात हसण्यासारखे काही प्रसंग येतात, जे वेचावे अन साठवावे लागतात. हेच ते प्रसंग.