...गूढकथा ही अनेक स्तरांवर पटण्याजोगी, मूलत: चांगली लिहिलेली कथा, दर्जेदार साहित्य असायला हवी. सर्वप्रथम ती, पात्रे, प्रसंग, मांडणी, त्यामागील आशय, वातावरण, भाषाशैली या सर्वच दृष्टींनी एक परिपूर्ण कथा असावी लागते. मानवी जीवनातील गूढता सांगणे, हे तिचे कार्य असते. त्याला पोषक अशी तिची निवेदनशैली असावी लागते. ...गूढकथा दर्जेदार ठरण्यासाठी, ती स्वतंत्र हवी. याचे कारण असे, की चांगल्या कथेत जे असते, ते चांगल्या गूढकथेतही यायला हवे, ते काय, तर लेखकाचे व्यक्तिमत्त्व! दुसर्या व्यक्तीविषयी आणि एकूण मानवसमाजाविषयीच्या त्याच्या भावना, त्याच्या स्वभावातील सहानुभूती, करुणा इत्यादी भाव, त्याचा प्रामाणिकपणा, या सार्या गोष्टी स्वतंत्र कथेतच उतरू शकतात. ...